"ठाकून ठोकून आकार देता येईल ,आपल्या सोयीनुसार, स्वभावानुसार वाकवून, बदलून घेता येईल अशी एक व्यवस्था म्हणजे लग्न..." हे वाक्य आहे शोभा डे यांच्या स्पाऊस - संसार सुखाचे रहस्य या पुस्तकातले..... हे वाक्य नजरेस पडताक्षणी मनाला खटकले... लग्न म्हणे काही व्यवस्था नाही.... लग्नाला व्यवस्था असे म्हणणे मला आवडले नाही... लग्न हि संस्था आहे.. तिला आकार देता येत नाही... झाडाला बिलगून वाढणाऱ्या वेलीसारखी ती वाढत जाते... आणि आयुष्याला एक अर्थ प्राप्त होतो.. ही वेल फुलते, फुलवते आणि समोरच्या माणसाला भरभरून आनंद देते...हे सर्व असताना लग्न ही व्यवस्था कशी होऊ शकते? दोन माणसांच्या मर्जीने निर्माण झालेले नाते ही व्यवस्था कशी असू शकते ????
लग्न ही व्यवस्था म्हणून समजणारे आणि त्याचप्रमाणे जगणाऱ्या जोडप्यांना पाहून मला आश्चर्य वाटते. किती तांत्रिकपणे वावरत असतील ही माणसे... स्वतःला त्रास करत ,दुसऱ्याची मर्जी सांभाळत... स्वतःच्या मनाचे विदीर्ण तुकडे करत आपले आयुष जगताना यांच्या मनात काहीच येत नसेल का? म्हणूनच लग्न ही व्यवस्था आहे असे म्हणायचे का? जर असे असेल तर 'लग्न' या व्यवस्थेत नक्की कीव करावी तरी कुणाची? त्यात अडकलेल्या माणसांची, समाजाची, लग्नाची कि स्वतःच्या सोयीनुसार बदलणाऱ्या या व्यवस्थेची....
लग्न ही व्यवस्था म्हणता म्हणता अशा अवस्थेला पोहोचली आहे की नेमक्या कोणत्या शब्दात तिचे वर्णन करावे हेच समजत नाही... बदलत्या दुनियेच्या नजरेतून पाहताना असे जाणवते की प्रत्येकजण स्वतःच्या सोयीनुसार नात्यांची गुंफण करतो आहे.. जिथे समर्पण आहे अशी नाती ओझी वाटतात आणि ज्या नात्यांमध्ये एकमेकांशी काहीही देणे घेणे नाही अशी नाती संस्कृती म्हणून समाजात आपले बस्थान बसवता आहेत.. नेमकेपणे सांगता येत नाही पण लग्नाचा प्रवास हा नेमका कुठल्या दिशेला होतो आहे याचा पत्ता लागत नाही.. आणि शोध घ्यायचा म्हटले तर कुठून घ्यावा हेच काळात नाही.......
आपल्या आजू बाजूला नजर फिरवल्यावर देखील अशी विखुरलेली नाती दिसतील.... वरून सर्व काही व्यवस्थित असणारी नाती आतून किती कमजोर आणि जीर्ण झालेली आहेत याचा आपल्याला पत्ता लागणे देखील कठीण आहे.... अशी ही समाजातली सगळ्यात महत्वाची लग्न संस्था आज कुठे चाली आहे.. हे कुणालाच माहिती नाही.... जर तुम्हाला काही माहिती असेल तर मला नक्की सांगा.... हा शोध घ्यायला मलाही आवडेल.....
No comments:
Post a Comment