Thursday, March 3, 2016

तुझा माझा संवाद हा, असाच काहीसा असतो…

शब्दात मांडता येत नाही
असा एक अनुभव असतो…
तुझा माझा संवाद हा,
असाच काहीसा असतो…

लटके राग रुसवे आणि बरचं काही,
तुझ्या माझ्यात काही नसतानाहि
असण्यासारख बरच काही …

निशब्द होतात शब्द आणि अबोल होतात विचार
सापडणार सापडत नाही,उमगणार उमगत नाही …
अस कसे रे होतो आपण दोघेही निराधार ….

असाच काहीसा हा लपंडाव  तुझ्या माझ्यात असतो …
 उन सावलीचा हा खेळ मग आपल्यात रंगतो…
सुटता सुटत नाही असा गुंता होऊन बसतो…
तुझा माझा संवाद हा, असाच काहीसा असतो… 

Tuesday, November 10, 2015

दादा आता तरी येशील का ?

आली दिवाळी यावर्षी ही
आता तरी येशील का?
गर्दीत हरवली मी दादा
हात माझा धरशील का ?

लहानपाणीपासून तूच माझा दादा
मोठेपणी हरवलास का?
रुसव्या फुग्व्यांच्या खेळात
खरच इतका रुसलास का ?

ऊन ऊन  दोन घास
तुझे माझे असायचे
धडपडणारे माझे पाय
आधार तुझा शोधायचे
दरवर्षी न चुकता भाऊबीजेला तू यायचास
वर्षभराच्या सगळ्या गोष्टींची
गोळाबेरीज करायचास

गेली कित्येक वर्ष दिवाळी आलीच नाही
भाऊबिजेला माझी ओवाळणी झालीच नाही
दरवर्षीप्रमाणे यावेळी सुद्धा येणार नाहीस का
मान अपमानाच्या धाग्यात असाच गुरफटून बसणार का?

बरच काही सुटत अस तुला सुद्धा वाटत का रे ?
आमच्यासारखं तुही आतून तुटतो का रे ?
सोडून ती मनापमानाची दुनिया
पुन्हा माझा दादा हो ना
फुलबाजी पेटवताना हात माझा पकडना
फराळाच्या ताटावरून भांडण माझ्याशी कर ना
भाऊबिजेच्या गिफ्ट वरून भांडण पुन्हा होऊ दे
सार काही विसरून पुन्हा गट्टी आपली जमू दे …

या वर्षी तरी दिवाळीला नक्की तू ये,…
खरच  हरवून जाईन दादा…
पिलू म्हणत जवळ घे… 

Sunday, September 7, 2014

पुन्हा एकदा प्रेमात पडण्यासाठी...

‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे...’ आपल्यापैकी प्रत्येकाने हे गाण ऐकले असेल असं मी गृहीत धरते.. (मला स्वत:ला कुणीही गृहीत धरलेलं आवडत नाही.. तुम्हा सर्वाना परवानगीशिवाय गृहीत धरल म्हणून सॉरी) पण याचा जरा मोकळेपणाने विचार करा.. की आपल्यापैकी प्रत्येकजण खरच जगण्यावर प्रेम करतो का? हल्ली लोक स्वत:ची बायको असतानाही दुसऱ्याच्या बायकोवर प्रेम करतात.. पण स्वत:वर प्रेम करत नाही.. का? याचं कारण शोधण्याचा आपल्यापैकी कितीजण प्रयत्न करतात.... कदाचित कुणीही नाही... कदाचित कुणीतरी... नक्की आकडा सांगता येणार नाही.. आणि सारख सारख मी गृहीत धरलेलं तुम्हाला देखील चालणार नाही.. हे माहिती आहे मला..

पण मधल्या काही काळत थोडा निवांत वेळ मिळाला या सर्व गोष्टीवर विचार करण्याचा... आपल्यापौकी कितीजण स्वत:च्या आयुष्यावर प्रेम करतात... कदाचित आपल्या मनात हा प्रश्न येईल की म्हणजे नेमक काय?? तर तुमच्या मनात येईल तेव्हा तुम्ही मोकळेपणाने हसता का? कधीतरी जे मनाला पटेल ती गोष्ट तुम्ही बाकीचे काय म्हणतील हा विचार न करता करतात का? कधीतरी संध्याकाळी समुद्र किनारी बसून स्वत;ची दु;ख स्वत:चा आनंद निसर्गाशी शेअर करता का? कधीतरी बर्फाची कॅन्डी सुर्रर्र असा आवाज करून खाता का? आवडीच पुस्तक कधीतरी वेळ काढून वाचता का? आपल्या जुन्या मित्रांशी तासनतास गप्पा मारता का? कधीतरी काहीतरी नवीन करून पाहता का... यादी खूप मोठी आहे... यातलं कदाचित काही मी मिस्स केलं ही असेन... तर माझ्यामते समाजाल वेड्या वाटणाऱ्या पण स्वत:च्या मनाला पटणाऱ्या गोष्टी आपल्यापैकी कितीजण करतात?

यादी मोठी... आणि प्रश्नांची उत्तर खरं तर खूप करावसं वाटत पण वेळच मिळत नाही किंवा लोक काय म्हणतील यापैकी एखादं असेल... पण आपल्याला पटणाऱ्या आवडणाऱ्या गोष्टी न करता फालतू गोष्टीवर विचार करत आयुष्य का घालवावं ... का विचार करावा जगाचा आणि समाजाचा.. जेव्हा आपल्याला जगण्यासाठी लागणारे श्वास आपण घेतो.. कुणा दुसर्याला घ्यायला सांगत नाही त्याचप्रमाणे आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी करण्यासाठी का दुसर्यचा विचार का करावा.. स्वत: पडून धडपडून उभं रहाण्याची क्षमता असताना का दुसरा कुणी आपल्याला सांभाळेल ही आशा धरावी... आयुष्य बिनधास्तपणे का जगू नये..


चिंब चिंब पावसात भिजताना लोक काय म्हणतील या पेक्षाही जेव्हा तो अंगावर झेलणारा पाउस आपण अनुभवू त्या क्षणी आपण खऱ्या अर्थाने जगण्यावरचं प्रेम अनुभवू... पुन्हा एकदा प्रेम करू.. पुन्हा एकदा प्रेमात पडण्यासाठी.. 

Tuesday, December 17, 2013

डोनेशन फोर कॅन्सर पेशंट..???

आज सकाळचीच गोष्ट ... मुंबई सेन्ट्रल स्टेशनवर एक मुलगा आणि एक मुलगी हातात एक पोस्टर घेऊन उभे होते " डोनेशन फोर कॅन्सर पेशंट'" नेहेमीप्रमाणे घाईत असल्याने वॉट्सअप वर चॅट करता करता सवयीप्रमाणे पहिले आणि घाई घाईने निघाले... डोळ्यासमोरून टे पोस्टर काही सेकंदात दूर गेले खरे पण त्या शब्दांनी दिवसभर अस्वस्थ करून ठेवल.

असे पोस्टर हातात धरून खरच डोनेशन मिळतात का हा विचार जास्त अस्वस्थ करणारा  होता. कुठलही निदर्शन म्हणा, मोर्चा म्हणा किंवा दुसरी कुठलीही गोष्ट म्हणा  हातात पोस्टर धरून त्यावरतीसंदेशलिहून लोकांपार्यात आपला विचार पोहोचविण्यासाठी याचा वापर केला जातो. पण प्रत्येक माणूस इतका घाई गडबडीत असतो की तो विचार तरी करतो का? किवा त्या पोस्टरच्या माध्यमातून जो विचार त्या व्यक्तीला समाजापर्यंत पोहोचवायचा असतो निदान तो तरी पोहोचतो का? हे असे विचार जास्त अस्वस्थ करून जातात.

आता दिवस संपला ती दोन्ही मुला दिवसभर उन्हामध्ये उभी राहिली असतील.. हजारो लोक त्या ब्रिजवरून गेलेलं असतील.. काही डोळ्यांना ते पोस्टर दिसले ही असले.. काही हातानी मदत केली ही असले.. शेकडो डोक्यानी त्यावर विचार केला ही असले पण त्या पोस्टरच्या माध्यमातून जो नेमका विचार स्माजापार्यात पोहोचायचं असेल तो पोहोचला असेल का? त्यां  मुलांचा हेतू कदाचित डोनेशन मागणे हा नसेल ही कदाचित त्या पोस्टरच्या माध्यमातून कॅन्सर ला मदत करण्याएवजी त्याच्या विरुद्ध लाड असेही त्यांना सुचवायचा असेल.. 

असो.. हा एक विचार मनात आल आणि तो तुमच्यापर्यंत  पोहोचवावा असे मला वाटले... 


Saturday, May 5, 2012

एक स्त्री म्हणून.....


आज् आपण २० व्या शतकात्यला स्वतंत्र स्त्रिया म्हणून जगत आहोत. आज आपण आर्थिकरीत्त्या स्वतंत्र आहोत पण वर्षानुवर्षे जखडलेला आपला समाज हा आजही परंपरा आणि चालीरीतीच्या नावाखाली स्त्रियांची पिळवणूक करत आहे. का तर आपल्या देशात पुरुष प्रधान संस्कृती आहे म्हणून... आणि स्त्रियांना जगताना समाजाने ज्या चौकटी आखून दिल्या आहेत त्याच चौकटीत तीने वावरावे म्हणून... पाहायला गेले तर आपण स्त्री मुक्तीवाद किंवा या सारख्या  अवजड शब्दांचा उपयोग करतो पण स्वतंत्रतेच्या नावाखाली आजची स्त्रियांच्या पायात कळत नकळतपणे असंख्य बेड्या आहेत. असाच एक बंडखोर विचार मनात आला आहे... आज ह्या क्षणाला स्वतःला स्वतंत्र म्हनुवून घेणाऱ्या किती स्त्रिया या खऱ्या अर्थाने स्वतंत्र आहे... आपल्या पैकी किती जणींना स्वतःच्या अस्तित्वाचा शोध लागलेला आहे आणि खऱ्या अर्थाने त्या स्वतःचे आयुष्य स्वतंत्रपणे जगत आहे...

समाजाला स्त्री प्रत्येक अर्थाने सांभाळत असते. कधी आई , बहिण ,बायको, मुलगी तर कधी मैत्रीण या नात्याने...पण हीच स्त्री जेव्हा स्वतःच्या अस्तित्वासाठी लढते... स्वतःच्या मागण्या समाजासमोर मांडते तेव्हा तिच्यावर स्वार्थी पणाचा ठपका का ठेवला जातो...स्त्री ही प्रत्येक रुपात जर समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घेते... तर तिच्या भावना समजणारे कोणीही का नसते...मग स्त्री ही पूर्वीच्या काळातली असो किंवा आजच्या काळातली तिच्या मनाला समजणारे कोणीही नसते... प्रत्येक वेळेस तडजोड आणि स्वतःचे मन मारणे हे जणू स्त्रीचे जन्मजात हक्क असल्यासारखे पुरुष तिला वागवत असतात....

स्त्रीची सर्वात जास्त कुचंबणा कुठल्या रुपात होत असेल तर ती आईच्या... असे मला वाटते... आई या रुपात वावरताना एकीकडे तिला महान समजले जाते तर दुसऱ्या टोकाला तिच्या हातात असंख्य जबाबदाऱ्या आणि तडजोड यांची भेटवस्तू दिली जाते. मुलांसाठी आपले सर्वस्व देताना या आईला स्वतःच्या अस्तित्वाचा विसर पडतो.. आशा , आकांक्षा आणि तिची स्वप्न ही कुठल्याकुठे विरून जातात... स्त्रीला स्वतःचे अस्तित्वच उरत नाही... मुल म्हणजे तिचे विश्व बनते.. आणि त्यांना घडवणे , एक चांगला माणूस बनवणे आणि समाजामध्ये एक जबाबदार नागरिक बनविणे ह्या ओझ्याखाली तिची स्वप्ने विरून जातात... कधी एक काळी स्वताचे कर्तुत्व गाजवणारी स्त्री ही ह्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दाबून जाते.. हरवून जाते... आणि हीच मुल मोठी झाल्यावर स्वतःच्या स्वप्नासाठी आईच्या मनाचा कणभर ही विचार करत नाही...याला काही अपवाद सुदैवाने नक्कीच असतील अशी मला आशा आहे...

मी इथे मांडलेले विचार हा सर्वाना पटेलच असा नाही आणि तशी कोणावरही जबरदस्ती देखील नाही... पण ‘मदर्स डे’ च्या निमित्ताने आपल्या पैकी सर्वाना हे खूप मनापासून सांगावेसे वाटते की ... आपल्या आईला तर सन्मान द्या पण त्याच बरोबर तिच्यातल्या स्त्री चा देखील सन्मान करा... कधीतरी वेळ काढून तिची स्वप्न आणि आकांक्षा जाणून घ्या... त्या एक दिवसापुरते तरी आईच्या आतमधील स्त्रीला मुक्तपणे जगू द्या... आज मी एक मुलगी आहे... एक बायको आहे ..... कालांतराने आई होणार आहे...पण मला माझ्यातल्या आशा आणि आकांक्षा इतरांनसारख्या वाऱ्यावर नाही सोड्याच्या आहेत.. मला माझी स्वप्न जगायची आहेत... पण माहिती नाही...परिणामी याचा अंत काय होणार आहे... मी ही इतरांसारखी चौकटीत आयुष्य जगणार आहे की जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःच्या स्वप्नांना देखील आकार देणार आहे.....

Thursday, December 22, 2011

सिक्रेट सान्ता



डिसेंबर महिन्याची १५ तारीख उलटली की नाताळ सणाची ओढ लागते. लहान मोठे सर्वचजण नाताळ सणाची आणि आपली आवडत्या सान्ताची आणि खासकरून सान्ताकडून मिळणाऱ्या गिफ्टची वाट बघत असतात. आपण कितीही मोठे झालो तरी नातळची क्रेझ ही लहान मुलांपासून ती वयस्कर अजोबांपर्यंतर सर्वांमध्येच सारखीच असते. आणि डिसेंबर महिना सुरु झाल्यावर प्रत्येकजण उत्सुकतेने वाट बघतो ती नाताळची..

नाताळच्या निमित्ताने बाजारपेठेत अनेक गिफ्ट्सचे विकल्प उपलब्ध असतात. पण स्वतःसाठी काही विकत घेण्यापेक्षा सांताक्लॉसच्या हातून मिळालेले गिफ्ट जास्त आवडतात.. लहानपणी उशीखाली मोजा ठेऊन झोप्याची सवय हळूहळू मोठे झाल्यावर कुठेतरी हरवत जाते खरी पण मनाच्या एका कोपर्यात आपण नेहेमीच सांताक्लॉसची वाट पाहत असतो.. रोज रोज ऑफिसला गेल्यावर टेबलावर समोर दिसणार काम्पुटर आणि फाईल्स इतक्या सवईच्या झालेल्या असतात की दैनंदिन आयुष्याचा एक भाग बनतात. तुमच्या माझ्या डेली रुटीनचा हा एक भागआहे.. थोडाफार फरक असेल कदाचित... काय बरोबर ना !  या सर्वातून थोडीशी सुटका मिळते ती दिवाळी आणि नाताळ सनाच्या निमित्ताने.. दिवाळीत तर सर्वच ऑफिसमध्ये ट्रेडीशनल डे साजरा केला जातो.. पण नाताळच्या निमित्ताने कॉर्पोरेटसने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक वेगळा आणि मजेदार उपक्रम आयोजित केला आहे.

सध्या सर्वच कॉर्पोरेटसमध्ये नाताळच्या निमित्ताने सिक्रेट सान्ता ही कॉनसेप्ट अस्तित्वात आणली आहे. हा सिक्रेट सान्ता कोण असेल बरं ! तर हा ऑफिसमधला आपलयाच कर्मचाऱ्यांपैकी एक असतो.  ऑफिसमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या नावाच्या चिठ्या काढल्या जातत आणि प्रत्येकाला एक एक चिठी उचलायला सांगितली जाते.  कोणाचे नाव कोणाल आले आहे  हे फक्त त्या व्यक्ती खेरीज दुसऱ्या कोणालाही ते नाव सांगण्यास मनाई असते. नाताळच्या दिवशी सिक्रेट सान्ताने त्या व्यक्तीसाठी सिक्रेटली गिफ्ट ठेवायचे असते.. खरच कामाच्या रोजच्या रामरगाड्यात अशाप्रकारे सिक्रेट सान्ताकडून मिळालेले गिफ्टची मज्जा काही औरच असते..लहानपणी उशीखाली मोजा ठेऊन झोपायची मज्जा आणि मोठे झाल्यावर ओफिस डेस्कवर सिक्रेट सान्ताकडून मिळालेले गिफ्ट या दोन्ही क्षणांचा आनंद हा अवर्णनीय असतो... कितीही मोठे झालो तरी आपल्या मनात एक लहान मुल असते असा म्हणतात... या अशा क्षणी आपल्यातल्या प्रत्येकाला लहानपण जगल्याचा आनंद पुन्हा मिळतो... आपल्याच ऑफिसमधील आपल्या सहकार्यासाठी काहीतरी गिफ्ट घ्यायचे आहे हा अनुभव खूप वेगळा असतो... कारण फक्त कामाच्या निमित्ताने ज्याच्याशी रोज बोलले जाते त्याला कामाच्या चौकटीबाहेर जाऊन काहीतरी द्यायचे आहे हे नकळतच कार्माचार्यामधील ऋणानुबंध अधिक घट्ट करतात. यासाठी काही वेगळे ट्रेनिग प्रोग्राम घ्यावे  लागत नाही...

आयुष्यात पुढे जाताना, यशाची मोठी मोठी शिखर गाठताना आशा प्रकारचे छोटे छोटे पण अविस्मरणीय क्षण खूप मोलाचे ठरतात...रोजच्या रुटीन आयुष्याला नवीन प्रकारची संजीवनी देऊन जातात.. ऑफिसच्या टेबलावर ठेवल्या जानार्या फाईल्स आणि कम्प्युटर समोरच्या जागेवर एक दिवस सिक्रेट सान्ताच्या गीफ्टचा असतो...आणि खरा सांगायचे तर ३६५दिवसांपैकी टेबलवर असणाऱ्या फाईल्स एक दिवस असणारे सिक्रेट सान्ताचे गिफ्ट खूप खूप महत्वाचे असते...

मग आता नाताळ जवळ येतो आहे... आत तुमच्या ही मनात सिक्रेट सान्ताबद्दल ओढ निर्माण झाली असेल.. मी तर खूप एक्सआईटेड आहे सिक्रेट सान्ताकडून गिफ्ट घेण्यासाठी.. आणि तुम्ही पण नक्कीच असाल.. पण गिफ्ट घेण्याच्या नादात तुम्ही स्वतही कोणाचे तरी सिक्रेट सान्ता बनायला विसरू नका... जो आनंद तुम्हाला कोणीतरी देणार आहे... तो आनंद तुम्ही देखील कोणालातरी द्या...